ब्लॉग डिटेल्स


श्री संत ज्ञानेश्वर


श्रीसंत ज्ञानेश्वरांचा हा अभंग, साधक त्याचा साधन-मार्ग क्रमित असताना, त्याला जेव्हा 'आत्मज्ञान ', म्हणजेच 'ज्ञानसुर्याचा ' बोध , श्रीसद्गुरु कृपेने होतो, तेव्हा ह्या 'ज्ञान ' सुर्याचा प्रकाश ज्यावेळी त्याच्यावर पडतो, त्यावेळची साधकाची, नेमकी स्थिती-अनुभूती, नेमकेपणाने आपल्यासमोर ठेवत आहे. ही अनुभूती आपल्यासमोर ठेवणारे श्रीज्ञाननाथ, हे सर्व ज्ञानयोग्यांचे 'ईश्वर' आहेत.त्यामुळेच त्यांचा ह्या साधन-मार्गावरचा अनुभव रुपी अभंग, निश्चीत पणे एखाद्या 'दीपस्तंभा ' प्रमाणे, आपल्यालाही 'मार्गदर्शक ' आहे. *अरे अरे ज्ञाना झालासी पावन |* यामधे 'अरे अरे ज्ञाना ' ही शब्दरचना, साधकाला 'आत्मज्ञानरुपी ' सुर्याचा उदय झालेला दर्शवित आहे. आता हा उदय झाल्या-झाल्या त्याच्या बाह्य, त्याचबरोबर अंतरंगाची स्थिती काय असते, हे सगळ वर्णन पुढील 'अभंग ' करतो. *झालासी पावन |* साधकाच्या अत:करणात, स्वत: 'पावन ' झाल्याचा- जीवन 'कृतकृत्य ' झाल्याचा 'भाव ' ओसंडून वाहू लागतो. *तुझे तुज ध्यान, कळो आले || १ ||* *तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव |* *फिटला संदेह अन्य तत्वी || २ ||* ह्या वरिल 'ओळी ' , साधकाला झालेला ' अहं ब्रम्हास्मी ' ह्या 'महावाक्याचा बोध ' स्पष्ट करतात. *मुरडुनिया मन उपजलासी चित्ते |* *कोठे तुज रिते न दिसे रया || ३ ||* ज्ञानसुर्याचा उदय झाल्यावर अजून काय काय होत? तर 'मनरुपी ' द्रवाचे, ' चित्तरुपी ' बर्फ़ात रुपांतर होते.म्हणजे काय होते? अध्यात्ममार्गाचे 'प्रवास-वर्णन ' करताना, ज्यानी-ज्यानी हा प्रवास पुर्ण केला आहे, त्या सगळ्या संत-महात्म्यानी सांगितले आहे, की 'मनाची ' धाव कायम 'विषयाकडे ' असते. मनाला एका जागी थांबणे माहीत नसते.ते सतत एका विषयावरून,दुसर्या विषयाकडे धावत असते. आता ह्या मनाचे हे 'मनपण ' कधी संपते? ह्या द्रवाचा, बर्फ़ कधी होतो? तर जेव्हा 'प्राण ' लय पावतो तेव्हाच. प्राणायाम करताना, आपण जेव्हा पुरक आणि रेचक करतो तेव्हा 'मन ' धावत असते. जेव्हा अंत:कुंभक किंवा बाह्यकुंभक करतो, म्हणजेच 'प्राण ' थांबतो, त्यावेळी मनाचे, विषयांचे चिंतन ही थांबते. ही स्थिती जेव्हा आपोआप, बर्याच वेळ रहाते, त्यालाच 'समाधी ' अवस्था, मनाचे चित्तरुपी बर्फ़ात रुपांतर,काष्ठ-समाधी असे म्हणतात.(पण ही समाधी अवस्था, वासना-वृत्ती-संस्कार अजूनही शिल्लक असल्यामूळे भंगते, हठयोगी या अवस्थेपर्यंतच पोहचू शकतात.) अशा प्रकारे सुरवातीला 'प्राणाचा लय ' होऊन 'मनाचा लय ' होण्याचा, अध्यात्ममार्गाचा प्रवास करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील कलीयुगात 'अखंड नामस्मरण ' हा एकमेव सहज-सोपा 'राजमार्ग-सोपानमार्ग ' आहे, हे श्री ज्ञानेश्वरादि संतानी एकमुखाने, एकवाक्यतेने, एकविचाराने, वेळोवेळी, करूणेने-कळकळीने सांगितले आहे.तरीपण आपली दृष्टि कायम बहिर्मुखी असल्यामूळे, आपण ह्या गोष्टि कायम हसण्यावारी नेतो, अजून एक टाइम-पासचे साधन किंवा वादविवादाचे साधन म्हणून दूर्लक्षित करतो. जोपर्यत आपण अंतर्मुख होऊन ह्या गोष्टिचा विचार-विवेक करत नाही, तोपर्यत हजारो सद्गुरु-संताचे-भगवंताचे अवतार होऊन गेलेतरी, आपल्यात तसुभरही फ़रक पडणार नाही ही काळ्यादगडावरची रेघ आहे, असे श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात. हा मार्ग चालायला आपल्यालाच लागतो, अनुभव-श्रीसद्गुरु हे केवळ 'मार्गदर्शक '. जगाच्या उत्पती पासून आजपर्यत अस एकही उदाहरण नाही की केवळ ऐत-बसून किंवा अध्यात्माची पुस्तकेच्या पुस्तके वाचून कुणाला श्रीभगंवतप्राप्ती झाली आहे. फ़ारतर काय वाद घालता येइल, पुस्तकी-उथळ ज्ञानाच प्रदर्शन करता येईल, पण खर 'आत्मज्ञान ' जर पाहीजे असेल तर , आपण 'अज्ञानी ' आहोत ह्याचा 'बोध ' झाला पाहीजे, संतानी हे अज्ञान दूर करण्यासाठी जे सांगितल आहे, त्याच्यावर चालायची बुध्दि, कृती करायचा विवेक जागृत झाला पाहीजे, तो 'योग-कर्मसाम्यदशा ' आली पाहीजे. आता प्राणाचा, मनाचा लय झाला, पण अजून 'चित्त,त्यावर चालणारी बुद्धी आणि अहंकार' अजूनही 'शिल्लक रहातो.मग त्याच काय होत? *दीपकी दीपक मावळल्या ज्योती |* *घरभरी वाती शून्य झाल्या || ४ ||* ह्या ओळीमध्ये दीपकी-मावळल्या-शून्य झाल्या, दीपक-ज्योती-घरभरी वाती यांचा अर्थ जाणुन घेण्यासाठी श्रीमाउलींचाच, श्री ज्ञानेश्वर-गाथेमधील खालील अभंगाच,श्रीसद्गुरुंच सहाय्य घेऊयात. *दीप दीपिका शशी तारा | होतु का कोटिवरी रे |* *परी न सरे निशि नुगवे दिवसु | दिनकरनाथें जियापरी रे ||* ज्ञा.गा.९२०.१ || दीप हे दिवाळीमध्ये घरोघरी लावले जातात, तसेच कार्तिक महिन्याच्या पोर्णिमेलाही सर्वत्रच मंदिरांतून हजारो दीप-दीपिका लावल्या जातात.त्याचबरोबर पोर्णिमा असल्यामुळे, आकाशात तारागणांसहित पूर्ण चंद्रही प्रकाशित झालेला असतो. इतके सगळे असले, किंबहुना असे दीप, आकाशातील तारे, कोटी जरी लावले किंवा उगवले, तरी पूर्वदिशेला राउळी, भगवान सुर्यनारायण उगवल्यावर, त्यापुढे या सर्वाचे तेज ज्याप्रमाणे फ़िके पडते, त्याचप्रमाणे 'आत्मज्ञान ' सुर्याचा उदय झाल्यावर आपल्या सर्वशरीरात(घरभरी) पसरलेल्या वासनारुपी तेलावर चालणार्या, बहात्तर कोटी नाड्या-वाती असलेल्या, दीपकाच्या ज्योती, फ़िक्या पडतात-लय पावतात, म्हणजेच 'चित्ताचा लय ' होतो,ते वासनारहित होते,शून्य होते.त्याचबरोबर 'बुद्धिचाही लय' होतो कारण बुद्धीला योग्य-अयोग्य निर्णय घ्यायला, चित्तातील वासना-पूर्वसंस्काराचा ठसा लागतो,तोच 'शून्य'होतो. अंत:करण चतुष्टयातील, 'मन, बुद्धि,चित्त, अहंकार ' ह्यातील अहंकार( 'मी ' ही जाणीव) अजून राहतोच. त्याच काय होत?ते पण 'लय ' पावायला पाहीजे! ते कसे? हे पुढिल ओळीत सांगितल आहे. *वृत्तीची निवृत्ती आपणां सकट |* ज्ञानसुर्याचा उदय झाल्यावर ' अहंकार ' ह्या उरणार्या अंत:करण वृत्तींची निवृत्ती-लय 'आपणां सकट ' म्हणजेच सगळ्यात शेवटी 'अहंकारासहीत ' होतो. आता हा शेवट्पर्यंत साथ देणारा, सगळ्यात शेवटी संपणारा 'अहंकार ' संपला, आता पुढे काय? तर, *अवघेंची वैकुंठ चतुर्भूज|| ५ ||* वैकुंठात, म्हणजेच ' सहस्त्रार-चक्रात ' , चतुर्भूज-सोहळा होतो, म्हणजेच 'दोनाचे चार हात ' होतात. म्हणजे नक्की काय होत? तर सहस्त्रारात असलेल्या, 'शिवत्वाचे-विठ्ठलाचे-परब्रम्हाचे ' आणि मूलाधारातून,सहाचक्राचे भेदन करून, 'जीवा 'सकट आलेल्या, श्रीजगदंबा,आईभवानी,मूळशक्ती,महामाया, कुंडलीनीशी, रुखमाईशी मिलन होते, जीवत्वाचे-शिवत्वात कायमचे रुपांतर होते, मनुष्यरुपी ओहोळ, समूद्ररुपी श्रीभगवंतात कायमचा, परत वेगळा न होण्याकरता मिसळून जातो, तो समूद्रच-परब्रम्हच होतो.यालाच अखंड 'संजिवन-समाधी' अवस्था म्हणतात. असा हा अंत:प्रवास आपल्या सगळ्यांचाही लवकरात होण्याकरता काय केले पाहीजे? श्रीज्ञानदेवांनी काय केले? त्यामूळे त्यांना वरिल अनुभूती आली, हे पुढील ओळित आहे. *निवृत्ती परम अनुभव नेमा|* तर त्यांनी 'परब्रम्हरुपी ' आपल्या श्रीसद्गुरु-श्रीनिवृत्तीनाथांनी दिलेली 'साधना ' नेमाने केली, त्याचमूळे हे सगळे अनुभव-अनुभूती त्यांनी अवघ्या २१ वर्षाच्या आयुष्यात, ' ह्याची देही,ह्याची डोळा ' घेतली. संचित-प्रारब्ध-क्रियमाण ही कर्मे बरोबर असताना, त्यांना हे सहजशक्य झाल कारण त्यांनी कृती केली. *शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो || ६ ||* शेवटी, ह्या सगळीकडे अखंड असलेल्या 'श्रीसद्गुरुतत्वाची ' मनधरनी श्रीज्ञानाई आपल्याकरता करतात की 'दया,क्षमा,शांती ' या दैवीगुणांचा उदय करणारा हा 'ज्ञानसुर्य ' आपल्यालाही लवकरात लवकर देवो-लाभो,म्हणजेच आपल्यालाही सर्वाना ही 'साधना' करण्याची 'सुबुद्धि' होऒ.

Priya Kawhale