ब्लॉग डिटेल्स


मरणाचे स्मरण !!


माझे साधन कमी जास्त प्रमाणात चालू असता मला रोज बारीक ताप येऊ लागला. पुष्कळ डॉक्टरांना आणि वैद्यांना दाखवले तरी काही केल्या ताप थांबेना. त्यामुळे अशक्तपणा येऊन रक्तक्षयाची सर्व लक्षणे दिसू लागली. आयुष्याच्या मध्यावर येऊन मरण्याची माझी तयारी नसल्याने "आपण आत्ताच मेलो तर?" या विचाराची भीती मनात भरली. मला लहानपणापासून मृत्यूचे विलक्षण कुतूहल होते. परंतु ज्यावेळी स्वतःचा देह थकू लागला आणि त्यावर काही उपाय सापडेना तेव्हा मात्र मला अत्यंत काळजी लागली. भीती आणि तिची लाडकी कन्या काळजी या दोघींचे खरे स्वरूप तेव्हा प्रत्यक्ष अनुभवाने मला कळले. आता दोन तीन वर्षात आपल्याला मरण येणार आणि येथील सगळे जबरदस्तीने येथेच सोडून जावे लागणार अशी आतून माझी खात्री पटली. त्यामुळे मनाने मी अगदी केविलवाणा झालो. जीवाची भयंकर घालमेल होऊ लागली. आपण केव्हातरी मरणार हे प्रत्येकाला ठाऊक असते पण नको असताना जर मृत्यूची चाहूल लागली तर जीवाची होणारी धडपड अनुभवल्यावाचून कळायची नाही. जगात दिसणाऱ्या पण अखेर जगातच राहणाऱ्या घरदार, पैसाआडका, मानसन्मान इत्यादी गोष्टींवरून माझे मन बरेच उतरले. श्रीसद्गुरु आणि त्यांनी दिलेले भगवंताचे नाम या दोघांशिवाय अंतकाळी इतर कोणी आपल्या उपयोगास येणार नाही हे सत्य मला स्वानुभवाने समजले. आता कसाही प्रसंग आला तरी त्यामध्ये मन शांत ठेवण्यास नामावाचून अन्य उपाय नाही ही संपूर्ण खात्री झाल्याने तेच नाम मी मनापासून घेऊ लागलो. माझ्या नामस्मरणाच्या अभ्यासाच्या तिसऱ्या पायरीला येथून आरंभ झाला. त्या गोष्टीला आज पंचवीस वर्षे होऊन गेली. अजून मी जिवंत आहे पण-- मरणाचे स्मरण सतत राहिले, तर नामस्मरण उत्तम चालते हे साधनमार्गातील एक रहस्य मला उकलले !...........प.पु.बेलसरे

Priya Kawhale