ब्लॉग डिटेल्स


सिध्दराज श्री दत्तात्रेय*


सद्गुरु भगवान श्री दत्तात्रेय यांचा सातवा अवतार म्हणजे *सिध्दराज* या नावाने प्रसिध्द आहे. लीलाविश्वभंर दत्त या नावाने अवतरुन अपेक्षित असलेले सर्व कार्य पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रेयप्रभूंनी सिध्दराज या नावाचा अवतार घेतला. सदगुरु श्री लीलाविश्वंभर देव हे एकदा स्वत:चे रुप लोकाच्या लक्षात येऊ न देता बालरुपाने प्रकट झाले व भूतलावर इतस्तत: पर्यटन करीत करीत हिमाचल प्रदेशातील बदरिकावनात एकटेच प्रविष्ट झाले. तेथे अनेक सिध्द् लोक वास्तव्य करीत होते. त्यांनी खडतर तपश्चर्या करुन कष्टसाध्य अशा सिध्दि मिळविलेल्या होत्या. त्या सिध्दिंच्या जिवावर ते अनेक प्रकारचे सुखे भोगीत व चैन करीत काळ कंठीत होते. सिध्दिंच्या बळावर ते खूपच कामाक्रोधदि विकारांच्या आहारी गेलेले होते. कोणी लंगोटी परिधान करुन तर कोणी नग्न अवस्थेतहि राहत होते. कोणी मौन धारण करुन बसलेले होते, तर कोणी आत्मप्रौढींचे वर्णन करण्यात गर्क झालेले होते. कोणी आस्तिकांचा पक्ष घेऊन तर कोणी नास्तीकांचा पक्ष घेऊन निरनिराळया विषयांवर वादविवाद करीत बसलेले होते. एकदा त्या सिध्दांचा मेळावा एका ठिकाणी जमला होता. त्या मेळाव्यात लीलाविश्वंभर दत्तात्रेय हे बालरुप धारण करुन सर्वांच्या मागे जाऊन बसले. सर्व सिध्दांच्या स्वभावाची परीक्षा पाहणे व त्यांच्या गर्वाचा परिहार करणे हा उद्देश्य दत्तात्रेयांनी मनात ठेवलेला होता. दत्तात्रेयांचे ते अत्यंत तेजस्वी व दिव्य बालरुप पाहून सर्वांची दृष्टी त्यांच्याकडे आकृष्ट झाली. अत्यंत मनोहर असलेले बालयोगी भगवान दत्तात्रेय योगमूद्रेने बसलेले होते. दत्तात्रेयांना ऐटीत बसलेले पाहून सर्वांनी त्यांना प्रश्न केला, “बाळ तु कोण आहेस” त्यांचा हा प्रश्न ऐकून दत्तात्रेय म्हणाले, “ *माझे स्वरुप कोणाच्याही प्रतीतीला येणारे नसल्यामूळे मला अप्रतितस्वरुप म्हणतात*” “तूझा आश्रय कोण आहे ते तरी सांग” दत्तात्रेय म्हणाले, “ *मला कोणी आश्रय नाही व माझा कोणी आश्रय अथवा संरक्षकहि नाही.*” “तुझा योग कोणता व त्याच्या अभ्यासाची रीत कोणती” दत्तात्रेय म्हणाले “ *माझ्या योगाला मी चित्रयोग हे नाव दिलेले असून त्याच्या अभ्यासाची काही प्रक्रिया नाही.*” यावर सिध्दांनी विचारले, “तुझा गुरु तरी कोण आहे” त्यावर दत्तात्रेयांनी उत्तर दिले की, " *मला कोणी गुरु नाही.*" पुन्हा सिध्द म्हणाले, “तुझी मुद्रा कोणती, वैष्णवी की शांभवी” सिध्दराज म्हणाले " *माझी ही करुणात्मक मायेच्या पलीकडची निरंजनी मुद्रा आहे*” “अरे ती कशी असते” “ *जसा मी आहे तशीच ती असते*” “अरे या मूद्रेत तुला काय दिसत आहे” सिध्दराज दत्तात्रेय म्हणाले, “ *ध्यानातील अवस्थेत जे प्रचीतीला येते अर्थात ध्याता, ध्यान आणि ध्येय या त्रिपुटीच्या पलीकडचे जे काही तत्व आहे तेच माझे ध्येय होय*” याप्रमाणे ती सिध्दमंडळी व भगवान श्री दत्तात्रेय यांचा वादविवाद चालला असताना आकाशमार्गाने जात असलेले अकरा रुद्रा, बारा आदित्य, अष्ट वसू आणि त्याचप्रमाणे एकोणपन्नास मरुद्रगण तसेच महर्षि, साध्यदेव, यक्ष, गंधर्व व किन्नर हे जात असता त्यांची गति कुंठित होऊन ते सर्व भूतलावर त्या ठिकाणी अवतरले. त्यांना पाहून ती सर्व सिध्दमंडळी आश्चर्यचकित झाली. सिध्द लोकांना वाटले हे त्यांच्या सिध्दीचे फळ आहे व त्यामूळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यांचा तो परस्परांमध्ये चाललेला कलह पाहून श्री दत्तात्रेय त्यांना म्हणाले "सिध्दजनहो तुम्ही आपसात हे भांडण का करीत आहात तुम्ही सर्वच श्रेष्ठ आहात, पण तुमच्यात अधिक श्रेष्ठ कोण आहे याचा निर्णय घेण्याची सोपी युक्ती मी तुम्हांला सांगतो. गति कुंठित होऊन भूमंडलावर या ठिकाणी उतरलेले हे सर्व देव आणि इतर लोक ज्याच्या शब्दाने पुन: वर जातील तो तुम्हा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे समजा." त्यांचे भाषण ऐकून सर्व सिध्दजनांनी प्रयत्न केले पण एकाच्याही शब्दाचा उपयोग झाला नाही. कोणीही देव अथवा ऋषि मुनी आपआपल्या स्थानी हलूहि शकले नाही. यामुळे आपण खूप मोठी सिध्दी मिळवलेली आहे असे मानणारे ते सर्व सिध्दलोक अत्यंत लज्जित झाले. त्यांचा क्रोध मावळला. अहंकार पार गळाला. ते सर्व सिध्द निस्तब्ध झाले. त्यानंतर सिध्दराज श्री दत्तात्रेय म्हणाले "देव हो, ऋषि-मुनिजनहो तुम्ही सर्व आपआपल्या स्थानाला सत्वर जाऊन पोहोचावे. मी तुमचा प्रतिबंध दूर केला आहे. तुम्ही तिळमात्रही चिंता न करता आनंदाने आपआपल्या स्थानाला जावे. माझा तुमच्यावर अनुग्रह आहे." हे शब्द ऐकल्याबरोबर सर्व मंडळी एका क्षणात आपापल्या स्थानाला जाऊन पोहोचली. हे पाहून बदरिकाश्रमातील सर्व सिध्द महात्मे आश्चर्यचकित झाले व म्हणू लागले, खरोखर हा प्रत्यक्ष परमात्माच बालरुपाने आपल्यापुढे आवतरला आहे. सर्व सिध्दांनी दत्तात्रेयांच्या चरणी सादर प्रणिपात केला. देव व सिध्द यांनी त्या ठिकाणी दत्तात्रेय यांची मुक्त कंठाने स्तुति केली. सर्व सिध्दांना सिध्दी देणाऱ्या दत्तात्रेयांना *सिध्दराज* असे नाव देण्यात आले. रहस्य, न्यास, कवच इत्यादि सर्व तांत्रिक पध्दतींचाही उपदेश त्यांनी केला. सिध्दराजांनी स्वत:च हि शास्त्रपध्दत सांगितलेली असल्यामुळे या पध्दतीला सिध्दराजगम असे म्हणतात. हि सिध्दराज पध्दत श्री दासोपंत यांनीही उपदेशीली आहे. दासोपंतानी ती लिहूनही ठेवलेली आहे. हा अत्यंत महत्वाचा *ग्रंथ सिध्दराजगम या नावाने प्रसिध्द आहे*.

Priya Kawhale