ब्लॉग डिटेल्स


*देवदेव अथवा देवदेवेश्वर*


*अवतार चौदावा* सदगुरु भगवान दत्तात्रेय यांचा चौदावा अवतार देवेदेव अथवा देवदेवेश्वर या नावाने ओळखला जातो.मार्कडेय ऋषिंनी सांगितलेली कथा आहे. माहूर क्षेत्राच्या परिसरात विशेषत: शतानंदाला दर्शन देऊन अनुगृहित करण्यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय हे देवदेवेश्वराच्या रुपाने प्रकट झाले. याच अनुषंगाने स्वर्गातील इंद्रादि देव आणि सत्य लोकातील ब्रम्हदेव यांनाही दर्शन देऊन अनुगृहित करण्याचे कार्य देवदेवेश्वर प्रभूंनी केल्याचे पहावयास सापडते. भगवान श्रीदत्तात्रेय नर्मदेच्या दक्षिण तीरावरील अरण्यातून दक्षिण दिशेने प्रवास करीत करीत अतिप्राचीन अशा व सर्व पर्वतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सहयाद्री नावाच्या पर्वताजवळ आले. प्रवासामध्ये अनेक ऋषिमुनींचे आश्रम पाहात पहात त्यांनी तेथील ऋषिमुनींना आपल्या दर्शनाने पावन केले. अनेक नदया. तीर्थे व इतर जलाशय यांच्यामध्ये अवगाहन करुन त्यांना ते पवित्र करीत होते. ऋषिमुनींच्या आश्रमात जाऊन सर्वाच्यादक्षेमकल्याणाची विचारपूस करावी, कोठे स्नानसंध्यादी अनुष्ठान करुन क्षणभर विश्रांती घ्यावी तर कोठे भोजन करुनही भक्तजनांच्या मनाला संतोषीत करावे. अशा थाटात दत्तात्रेयमुनींची स्वारी तो सर्व रम्य प्रदेश अवलोकन करीत करीत सहयाचलाच्या रम्य परिसरात येऊन पोहोचली. सहय पर्वताचा तो परिसर त्यांना फारच रम्य वाटला. या भागातील पर्वतश्रेणीला काही ठिकाणी सिंहाद्र‍ि असेहि नाव दिलेले आढळते. दत्तात्रेयप्रभूंची ही तर जन्मभूमीच असल्यामुळे या परिसरात त्यांचे मन रमणे हे स्वाभाविकच आहे. तशी तर संपूर्ण सहयाद्रीची सर्व शिखरे त्यांना प्रिय वाटत होती पण त्यातल्या त्यात माहूरगडाच्या परिसरातील अनसूयेच्या शिखराजवळ असलेले एक शिखर दत्तात्रेयांना फारच आवडले. तेथेच ते बराच काळ आश्रम करुन राहिले. हे सर्व शिखर आज दत्तपादुकाशिखर अथवा दत्तशिखर या नावाने ओळखले जाते.

Priya Kawhale